Stotra Collection
Vishnu

Shri Vyankatesh Stotra

18px
।। श्री व्यंकटेश स्तोत्र ।। श्री गणेशाय नम: । श्री व्यंकटशाय नम: । ॐ नमो जी हेरंबा । सकळादि तू प्रारंभा । आठवूनी तुझी स्वरूपशोभा । वंदन भावे करीतसे ।।१।। नमन माझे हंसवाहिनी । वाग्वरदे विलासिनी । ग्रंथ वदावया निरुपणी । भावार्थखाणी जयामाजी ।।२।। नमन माझे गुरुवर्या । प्रकाशरूपा तू स्वामिया । स्फूर्ति द्यावी ग्रंथ वदावया । जेणे श्रोतया सुख वाटे ।।३।। नमन माझे संतसज्जना । आणि योगिया मुनिजना । सकळ श्रोतया साधुजना । नमन माझे साष्टांगी ।।४।। ग्रंथ ऐका प्रार्थनाशतक । महादोषांसी दाहक । तोषुनिया वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील ।।५।। जयजयाजी व्यंकटरमणा । दयासागरा परिपूर्णा । परंज्योती प्रकाशगहना । करितो प्रार्थना श्रवण कीजे ।।६।। जननीपरी त्वां पाळिले । पितयापरी त्वां सांभाळिले । सकळ संकटांपासुनि रक्षिले । पूर्ण दिधले प्रेमसुख ।।७।। हे अलोलिक जरी मानावे । तरी जग हे सृजिले आघवे । जनक जननीपण स्वभावें । सहज आले अंगासी ।।८।। दीननाथा प्रेमासाठी । भक्त रक्षिले संकटी । प्रेम दिधले अपूर्व गोष्टी । भजनासाठी भक्तांच्या ।।९।। आता परिसावी विज्ञापना । कृपाळुवा लक्ष्मीरमणा । मज घालोनि गर्भाधाना । अलोलिक रचना दाखविली ।।१०।। तुज न जाणता झालो कष्टी । आता दृढ तुझे पायी घातली मिठी । कृपाळुवा जगजेठी । अपराध पोटी घाली माझे ।।११।। माझिया अपराधांच्या राशी । भेदोनी गेल्या गगनासी । दयावंता हृषीकेशी । आपुल्या ब्रीदासी सत्य करी ।।१२।। पुत्राचे सहस्र अपराध । माता काय मानी तयाचा खेद । तेवी तू कृपाळू गोविंद । मायबाप मजलागी ।।१३।। उडदांमाजी काळेगोरे । काय निवडावे निवडणारे । कुचलिया वृक्षांची फळे । मधुर कोठोनी असतील ।।१४।। अराटीलागी मृदुता । कोठोनी असेल कृपावंता । पाषाणासी गुल्मलता । कैशियापरी फुटतील ।।१५।। आपादमस्तकावरी अन्यायी । परी तुझे पदरी पडिलो पाही । आता रक्षण नाना उपायी । करणे तुज उचित ।।१६।। समर्थांचे घरीचे श्र्वान । त्यासी सर्वही देती मान । तैसा तुझा म्हणवितो दीन । हा अपमान कवणाचा ।।१७।। लक्ष्मी तुझे पायांतळी । आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी । येणे तुझी ब्रीदावळी । कैसी राहील गोविंदा ।।१८।। कुबेर तुझा भांडारी । आम्हां फिरविसी दारोदारी । यात पुरुषार्थ मुरारी । काय तुजला पै आला ।।१९।। द्रौपदीसी वस्त्रे अनंता । देत होतासी भाग्यवंता । आम्हांलागी कृपणता । कोठोनी आणिली गोविंदा ।।२०।। मावेची करुनी द्रौपदी सती । अन्ने पुरविली मध्यराती । ऋषीश्र्वरांच्या बैसल्या पंक्ती । तृप्त केल्या क्षणमात्रे ।।२१।। अन्नासाठी दाही दिशा । आम्हां फिरविसी जगदीशा । कृपाळुवा परमपुरुषा । करुणा कैशी तुज न ये ।।२२।। अंगीकारी या शिरोमणि । तुज प्रार्थितो मधुर वचनी । अंगीकार केलिया झणी । मज हातींचे न सोडावे ।।२३।। समुद्रे अंगीकारीला वडवानळ । तेणे अंतरी होतसे विहवळ । ऐसे असोनी सर्वकाळ । अंतरी साठविला तयाने ।।२४।। कूर्मे पृथ्वीचा घेतला भार । तेणे सोडीला नाही बडिवार । एवढा ब्रम्हांडगोळ थोर । त्याचा अंगीकार पै केला ।।२५।। शंकरे धरिले हाळाहळा । तेणे नीळवर्ण झाला गळा । परी त्यागिले नाही गोपाळा । भक्तवत्सला गोविंदा ।।२६।। माझ्या अपराधांच्या परी । वर्णिता शिणली वैखरी । दृष्ट पतीत दुराचारी । अधमाहुनि अधम ।।२७।। विषयासक्त मंदमति आळशी । कृपण कुव्यसनी मलिन मानसी । सदा सर्वकाळ सज्जनांशी । द्रोह करी सर्वदा ।।२८।। वचनोक्ति नाही मधुर । अत्यंत जनांसी निष्ठुर । सकळ पामरांमाजी पामर । व्यर्थ बडिवार जगी वाजे ।।२९।। काम क्रोध मद मत्सर । हे शरीर त्यांचे बिढार । कामकल्पनेसी थार । दृढ येथे केला असे ।।३०।। अठरा भार वनस्पतींची लेखणी । समुद्र भरला मषीकरुनी । माझे अवगुण लिहिता धरणी । तरी लिहिले न जाती ।।३१।। ऐसा पतित मी खरा । परी तू पतितपावन शारद्गधरा । तुवा अंगीकार केलिया गदाधरा । कोण दोषगुण गणील ।।३२।। नीच रतली रायाशी । तिसी कोण म्हणेल दासी । लोह लागता परिसासी । पूर्वास्थिती मग कैंची ।।३३।। गावीचे होते लेंडवोहळ । गंगेसी मिळता गंगाजळ । कागविष्ठेचे झाले पिंपळ । तयांसी निद्य कोण म्हणे ।।३४।। तसा कुजाति मी अमंगळ । परी तुझा म्हणवितो केवळ । कन्या देऊनिया कुळ । मग काय विचारावे ।।३५।। जाणत असता अपराधी नर । तरी का केला अंगीकार । अंगीकारावरी अव्हेर । समर्थे न केला पाहिजे ।।३६।। धाव पाव रें गोविंदा । हाती घेवोनिया गदा । करी माझ्या कर्माचा चेंदा । सच्चिदानंदा श्रीहरी ।।३७।। तुझिया नामाची अपरिमित शक्ति । तेथें माझी पापे किती । कृपाळुवा लक्ष्मीपती । बरवे चित्ती विचारी ।।३८।। तुझे नाम पतितपावन । तुझे नाम कलिमलदहन । तुझे नाम भवतारण । संकटनाशन नाम तुझे ।।३९।। आता प्रार्थना ऐके कमळापती । तुझे नामी राहे माझी मती । हेचि मागतो पुढतपुढती । परंज्योती व्यंकटेशा ।।४०।। तू अनंत तुझी अनंत नामे । तयांमाजी अति सुगमे । ती मी अल्पमति प्रेमे । स्मरूनी प्रार्थना करीतसे ।।४१।। श्रीव्यंकटेशा वासुदेवा । प्रद्युमन्ना अनंता केशवा । संकर्षणा श्रीधरा माधवा । नारायणा आदिमूर्ते ।।४२।। पद्मनाभा दामोदरा । प्रकाशगहना परात्परा । आदिअनादि विश्वंभरा । जगदुद्धारा जगदीशा ।।४३।। कृष्णा विष्णो हृषीकेशा । अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा । नृसिंह वामन भार्गवेशा । बौद्ध कलंकी निजमूर्ती ।।४४।। अनाथरक्षका आदिपुरुषा । पूर्णब्रम्ह सनातन निर्दोषा । सकळ मंगळ मंगळाधीशा । सज्जनजीवना सुखमूर्ते ।।४५।। गुणातीता गुणज्ञा । निजबोधरूपा निमग्ना । शुद्ध सात्विका सुज्ञा । गुणप्राज्ञा परमेश्वरा ।।४६।। श्रीनिधीश्रीवत्सलांछन धरा । भयकृद्भयनाशना गिरीधरा । दृष्टदैत्यसंहारकरा । वीर सुखकरा तू एक ।।४७।। निखिल निरंजन निर्विकारा । विवेकखाणी- वैरागरा । मधुमुरदैत्यसंहारकरा । असुरमर्दना उग्रमुर्ते ।।४८।। शंखचक्रगदाधरा । गरुडवाहना भक्तप्रियकरा । गोपीमनरंजना सुखकरा । अखंडित स्वभावे ।।४९।। नानानाटक सूत्रधारिया । जगद्व्यापका जगद्वर्या । कृपासमुद्रा करुणालया । मुनिजनध्येया मूळमूर्ति ।।५०।। शेषशयना सार्वभौमा । वैकुंठवासिया निरुपमा । भक्तकैवारिया गुणधामा । पाव आम्हां ये समयी ।।५१।। ऐसी प्रार्थना करुनी देवीदास । अंतरी आठविला श्रीव्यंकटेश । स्मरता हृदयी प्रकटला ईश । त्या सुखासी पार नाही ।।५२।। हृदयी आविर्भवली मूर्ति । त्या सुखाची अलोलिक स्थिती । आपुले आपण श्रीपती । वाचेहाती वदवीतसे ।।५३।। ते स्वरूप अत्यंत सुंदर । श्रोती श्रवण कीजे सादर । सावळी तनु सुकुमार । कुंकुमाकार पादपद्मे ।।५४।। सुरेख सरळ अंगोळिका । नखे जैसी चंद्ररेखा । घोटीव सुनीळ अपूर्व देखा । इंद्रनिळाचियेपरी ।।५५।। चरणी वाळे घागरिया । वाकी वरत्या गुजरिया । सरळ सुंदर पोटरिया । कर्दळीस्तंभाचियेपरी ।।५६।। गुडघे मांडिया जानुस्थळ । कटितटि किंकिणी विशाळ । खालते विश्वंउत्पत्तिस्थळ । वरी झळाळे सोनसळा ।।५७।। कटीवरते नाभिस्थान । जेथोनि ब्रम्हा झाला उत्पन्न । उदरी त्रिवळी शोभे गहन । त्रैलोक्य संपूर्ण जयामाजी ।।५८।। वक्ष:स्थळी शोभे पदक । पाहोनी चंद्रमा अधोमुख । वैजयंती करी लखलख । विद्युल्लतेचियेपरी ।।५९।। हृदयी श्रीवत्सलांछन । भूषण मिरवी श्रीभगवान । तयावरते कंठस्थान । जयासी मुनिजन अवलोकिती ।।६०।। उभय बाहुदंड सरळ । नखे चंद्रापरीस तेजाळ । शोभती दोन्ही करकमळ । रातोत्पलाचियेपरी ।।६१।। मनगटी विराजती कंकणे । बाहुवटी बाहुभूषणे । कंठी लेइली आभरणे । सूर्यकिरणे उगवली ।।६२।। कंठावरुते मुखकमळ । हनुवटी अत्यंत सुनीळ । मुखचंद्रमा अति निर्मळ । भक्तस्नेहाळ गोविंदा ।।६३।। दोन्ही अधरांमाजी दंतपंक्ती । जिव्हा जैसी लावण्यज्योती । अधरामृतप्राप्तीची गती । ते सुख जाणे लक्ष्मी ।।६४।। सरळ सुंदर नासिक । जेथे पवनासी झाले सुख । गंडस्थळीचे तेज अधिक । लखलखीत दोन्ही भागी ।।६५।। त्रिभुवनीचे तेज एकटवले । बरवेपण शिगेसी आले । दोन्ही पातयांनी धरिले । तेज नेत्र श्रीहरीचे ।।६६।। व्यंकटा भृकुटिया सुनीळा । कर्णद्वयाची अभिनव लीळा । कुंडलांच्या फाकती कळा । तो सुखसोहळा अलोलिक ।।६७।। भाळ विशाळ सुरेख । वरती शोभे कस्तूरीटिळक । केश कुरळ अलोलिक । मस्तकावरी शोभती ।।६८।। मस्तकी मुकुट आणि किरीटी । सभोवती झिळमिळ्याची दाटी । त्यावरी मयूरपिच्छांची वेटी ।ऐसा जगजेठी देखिला ।।६९।। ऐसा तू देवाधिदेव । गुणातीत वासुदेव । माझिया भक्तिस्तव । सगुणरूप झालासी ।।७०।। आता करू तुझी पूजा । जगज्जीवना अधोक्षजा । आर्ष भावार्थ हा माझा । तुज अर्पण केला असे ।।७१।। करुनी पंचामृतस्नान । शुद्धोधक वरी घालून । तुज करू मंगलस्नान । पुरुषसूक्ते करुनिया ।।७२।। वस्त्रे आणि यज्ञोपवीत । तुजलागी करू प्रीत्यर्थ । गंधाक्षता पुष्पे बहुत । तुजलागी समर्पू ।।७३।। धूप दीप नैवेध्य । फल तांबूल दक्षिणा शुद्ध । वस्त्रे भूषणे गोमेद । पद्मरागादिकरून ।।७४।। भक्तवत्सला गोविंदा । ही पूजा अंगीकारावी परमानंदा । नमस्कारुनी पादारविंदा । मग प्रदक्षिणा आरंभिली ।।७५।। ऐसा षोडशोपचारे भगवंत । यथाविधी पूजिला हृदयात । मग प्रार्थना आरंभिली बहुत । वरप्रसाद मागावया ।।७६।। जयजयाजी श्रुतिशास्त्रआगमा । जयजयाजी गुणातीत परब्रम्हा । जयजयाजी हृदयवासिया रामा । जगदुद्धारा जगद्गुरो ।।७७।। जयजयाजी पंकजाक्षा । जयजयाजी कमळाधीशा । जयजयाजी पूर्णपरेशा । अव्यक्तव्यक्ता सुखमूर्ते ।।७८।। जयजयाजी भक्तरक्षका । जयजयाजी वैकुंठनायका । जयजयाजी जगपालका । भक्तांसी सखा तू एक ।।७९।। जयजयाजी निरंजना । जयजयाजी परात्परगहना । जयजयाजी शुन्यातीत निर्गुणा । परिसावी विज्ञापना एक माझी ।।८०।। मजलागी देई ऐसा वर । जेणे घडेल परोपकार । हेचि मागणे साचार । वारंवार प्रार्थितसे ।।८१।। हा ग्रंथ जो पठण करी । त्यासी दु:ख नसावे संसारी । पठणमात्रे चराचरी । विजयी करी जगाते ।।८२।। लग्नार्थीयाचे व्हावे लग्न । धनार्थियासी व्हावे धन । पुत्रार्थियासे मनोरथ पूर्ण । पुत्र देऊनी करावे ।।८३।। पुत्र विजयी आणि पंडित । शतायुषी भाग्यवंत । पितृसेवेसी अत्यंत रत । जायचे चित्त सर्वकाळ ।।८४।। उदार आणि सर्वज्ञ । पुत्र देई भक्तांलागून । व्याधिष्ठांची पीडा हरण । तत्काळ कीजे गोविंदा ।।८५।। क्षय अपस्मार कुष्ठादिरोग । ग्रंथपठणे सरावा भोग । योगाभ्यासियासी योग । पठणमात्रे साधावा ।।८६।। दरिद्री व्हावा भाग्यवंत । शत्रूचा व्हावा नि:पात । सभा व्हावी वश समस्त । ग्रंथपठणेकरुनिया ।।८७।। विद्यार्थीयासी विद्या व्हावी । युद्धी शस्त्रे न लागावी । पठणे जगात कीर्ती व्हावी । साधु साधु म्हणोनिया ।।८८।। अंती व्हावे मोक्षसाधन । ऐसे प्रार्थनेसी दीजे मन । एवढे मागती वरदान । कृपानिधे गोविंदा ।।८९।। प्रसन्न झाला व्यंकटरमण । देवीदासासी दिधले वरदान । ग्रंथाक्षरी माझे वचन । यथार्थ जाण निश्चयेसी ।।९०।। ग्रंथी धरोनी विश्वास । पठण करील रात्रंदिवस । त्यालागी मी जगदीश । क्षण एक न विसंबे ।।९१।। इच्छा धरुनी करील पठण । त्याचे सांगतो मी प्रमाण । सर्व कामनेसी साधन । पठण एक मंडळ ।।९२।। पुत्रार्थियाने तीन मास । धनार्थियाने एकवीस दिवस । कन्यार्थियाने षण्मास । ग्रंथ आदरे वाचवा ।।९३।। क्षय अपस्मार कुष्ठादिरोग । इत्यादि साधने प्रयोग । त्यासी एक मंडळ सांग । पठणे करुनी कार्यसिद्धी ।।९४।। हे वाक्य माझे नेमस्त । ऐसे बोलिला श्रीभगवंत । साच न मानी जयाचे चित्त । त्यासी अध:पात सत्य होय ।।९५।। विश्वास धरील ग्रंथपठणी । त्यासी कृपा करील चक्रपाणी । वर दिधला कृपा करूनि । अनुभवे कळो येईल ।।९६।। गजेंद्राचिया आकांतासी । कैसा पावला हृषीकेशी । प्रल्हादाचिया भावार्थासी । स्तंभातूनि प्रकटला ।।९७।। वज्रासाठी गोविंदा । गोवर्धन परमानंदा । उचलोनिया स्वानंदकंदा । सुखी केलें तये वेळी ।।९८।। वत्साचेपरी भक्तांसी । मोहे पान्हावे धेनु जैसी । मातेच्या स्नेहतुलनेसी । त्याचपरी घडलेसे ।।९९।। ऐसा तू माझा दातार । भक्तासी घालिसी कृपेची पाखर । हा तयाचा निर्धार । अनाथनाथ नाम तुझे ।।१००।। श्री चैतन्यकृपा अलोकिक । संतोषोनी वैकुंठनायक । वर दिधला अलोकिक । जेणे सुख सकळांसी ।।१०१।। हा ग्रंथ लिहिता गोविंद । या वचनी न धरावा भेद । हृदयी वसे परमानंद । अनुभवसिद्ध सकळांसी ।।१०२।। या ग्रंथीचा इतिहास । भावे बोलिला विष्णुदास । आणिक न लागती सायास । पठणमात्रे कार्यसिद्धी ।।१०३।। पार्वतीस उपदेशी कैलासनायक । पूर्णानंद प्रेमसुख । त्याचा पार न जाणती ब्रम्हादिक । मुनि सुरवर विस्मित ।।१०४।। प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी । त्रैलोक्य भजत त्रिकाळी । ध्याती योगी आणि चंद्रमौळी । शेषाद्रीपर्वती उभा असे ।।१०५।। देवीदास विनवी श्रोतया चतुरा । प्रार्थनाशतक पठण करा । जावया मोक्षाचिया मंदिरा । काही न लागती सायास ।।१०६।। एकाग्रचित्ते एकांती । अनुष्ठान कीजे मध्यराती । बैसोनिया स्वस्थचित्ती । प्रत्यक्ष मूर्ति प्रकटेल ।।१०७।। तेथें देहभावासी नुरे ठाव । अवघा चतुर्भुज देव । त्याचे चरणी ठेवोनि भाव । वरप्रसाद मागावा ।।१०८।। इति श्री देवी दास विरचितं श्री व्यंकटेश स्तोत्रं संपूर्णम । ।। श्री व्यंकटेशार्पणमस्तु ।।

Benefits

Recitation of Shri Vyankatesh Stotra is considered highly beneficial: • For fulfillment of all desires — one complete recitation cycle • For progeny — three months of daily recitation • For wealth — twenty-one days of daily recitation • For daughter's marriage — six months of daily recitation • For cure of diseases — one complete recitation cycle • For knowledge, victory over enemies, fame, and liberation • The phalshruti (fruit of recitation) was spoken by Lord Venkateshwara Himself (verses 90-108)
#vyankatesh#venkateshwara#balaji#tirupati#stotra#devidas#prarthana-shatak#vishnu#108-shlok